जळगाव जिल्हा परिषदेत विविध पदांच्या 612 जागांसाठी लवकरच भरती

ZP Jalgaon Recruitment 2023 : ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत गट क मध्ये 16 संवर्गातील अंदाजीत 612 पदे सरळ सेवेने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

यासंदर्भात आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार होऊन जाहिरातीशी संबंधित कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच एकूण रिक्त पदांच्या 10% पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून तर 20 टक्के पदे अनुकंपाची या भरती प्रक्रिया दरम्यानच भरण्यात येणार आहेत. असेही डॉ. आशिया यांनी कळविले आहे.

रिक्त पदे 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पद भरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे 21 ऑक्टोबर, 2022 व 15 नोव्हेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

सदर पद भरतीची परीक्षा आयबीपीएस या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज दाखल केल्यापासून परीक्षेपर्यंत उमेदवारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. 0257/2224255 या हेल्पलाइन क्रमांकावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. आशिया यांनी केले आहे.