पोरांनो लागा तयारीला..! राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये लवकरच 19000 पदांसाठी भरती

राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये लवकरच विविध पदाच्या १८ हजार ९३९ रिक्त जागांसाठी पदभरती केली जाणार आहे. यासाठीची जाहिरात येत्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्‍चय ग्रामविकास विभागाने केला आहे.

गेल्या ७ वर्षांपासून जिल्हा परिषदांमध्ये भरती झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थांना या भरतीची बराच काळ वाट पहावी लागली आहे. या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

२०१६ पासून रखडली होती भरती
जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची सन २०१६ पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरु केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या होत्या. शिवाय या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे आता लवकरच १८ हजार ९३९ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

कोणत्या विभागात होणार भरती?
पाणी पुरवठा आणि स्वच्छता
सामान्य प्रशासन विभाग
अन्न आणि नागरी पुरवठा
सार्वजनिक बांधकाम विभाग
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग